Tuljapur Temple Controversy : तुळजापूरच्या पवित्र श्री तुळजाभवानी मंदिरात मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिरातील पुजाऱ्यांनी आरोप केला आहे की, शस्त्रपूजन विधीत वापरली जाणारी तलवार गायब झाली आहे. ही तलवार मंदिराच्या खजिन्यात ठेवली जाते, मात्र सध्या ती सापडत नसून ती मंदिराच्या बाहेर नेण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पुजाऱ्यांच्या मते, ही तलवार केवळ एक शस्त्र नसून, ती वैदिक मंत्रांनी शक्तिपात करून पूजित करण्यात आली होती. त्यांनी दावा केला आहे की, श्री तुळजाभवानी देवीच्या आठ आयुधांचे तत्त्व आणि शक्ती विशेष विधीने या तलवारीत समाविष्ट करण्यात आल्या होत्या. हा विधी पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्याचा दावा केला जात आहे.
पुजाऱ्यांनी पुढे सांगितले की, होम-हवन करून या तलवारीत देवीची शक्ती स्थानांतरीत करण्यात आली होती. आता त्यांनी ही पवित्र तलवार पुन्हा मंदिरात आणून, देवीच्या मूर्तीच्या जवळ ठेवावी, अशी मागणी केली आहे, जेणेकरून भक्तांना ती दर्शनासाठी उपलब्ध होईल. तसेच, मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला न सांगता हे विधी पार पाडल्याचा आरोपही त्यांनी मंदिर संस्थानावर केला आहे. यामुळे धार्मिक परंपरेचे उल्लंघन झाल्याचेही पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मंदिर संस्थानने या प्रकरणावर अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. "प्रकरणाची चौकशी सुरू आहे" आणि "संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे" असे सांगून त्यांनी सावध भूमिका घेतली आहे.
या वादामुळे मंदिर प्रशासनावर स्पष्टीकरण देण्याचा दबाव वाढला असून, तलवार अजूनही गायब असल्यामुळे भाविकांमध्ये आणि धार्मिक वर्तुळात चिंता वाढली आहे.