सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठ्या उलथापालथी घडताना दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. अशातच एक ठाण्यात लावलेलं पोस्टर चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. परंतू काहीवेळानी हे बॅनर काढला आहे. उद्धव ठाकरे गटाचे ठाणे शहर प्रवक्ते तुषार दिलीप रसाळ यांनी तीन हात नाका परिसरात पुलालगत एक भलेमोठे पोस्टर लावली असून, हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टरमुळे ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत, ही मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
या पोस्टरवर तुषार रसाळ यांनी थेट लिहिलं आहे –
"मी तुषार दिलीप रसाळ. कै. दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाते बाप आहेत. मा. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत.
दोन वाघांनी एकत्र यायला पाहिजे, ही महाराष्ट्राची इच्छा आहे."
या घोषणेसोबतच पोस्टरवर एक बाजूला उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांचा फोटो झळकत आहे. या पोस्टरमुळे ठाणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, अनेकजण यामागील राजकीय संकेतांवर चर्चा करत आहेत. तुषार रसाळ यांनी हे पोस्टर लावून केवळ आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग मिळण्याची चिन्हेही निर्माण केली आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील एकी ही अनेक शिवसैनिकांची आणि महाराष्ट्रातील जनतेची इच्छा असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केलं आहे. या पोस्टरच्या निमित्ताने "ठाकरे बंधू एकत्र येणार का?" या चर्चेला पुन्हा उधाण आलं असून, याचे राजकीय पडसाद लवकरच उमटतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.