ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आज शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी ठाण्यामध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी संजय राऊतांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊतांनी केलेलं भाषण अधिक चर्चेत राहिले. हे दिवस ही जातील, सुरुवात ठाण्यातून झाली होती, नवा इतिहासही ठाण्यातच होईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
टेंभी नाक्यावर आलो आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवाद करण्यासाठी पोहोचलो तेव्हा पाच पंचवीस महिला समोर आल्या गद्दारांना महिलांना पुढे करायची सवयच आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वाहक आणि वारसदार आहोत. हे फक्त होर्डिंग लावतात, यांचा वारसदार म्हणून जन्म गुजरातला झाला आहे. जेव्हा शंभर रेडे कापले तेव्हा एक जन्माला आला. त्यामुळे ठाणेकरांना निष्ठा सांगण्याची गरज नाही, ठाणेकरांनी निष्ठा काय असते हे वारंवार महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे, असा हल्लाबोल यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.