खाते वाटप झाल्यावर महिनाभर पालकमंत्रीपदाची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकमंत्री पदाची निवड कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील पालकमंत्र्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे. अखेर महाराष्ट्रातील पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे.
पालकमंत्री पदाच्या निवडीची यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान रत्नागिरीच्या पालकमंत्री निवडीची घोषणा करण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्योग तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची वर्णी लागण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उद्योग व मराठी भाषा या दोन खात्यांच्या कार्यभार सांभाळणारे मंत्री उदय सामंत यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज रत्नागिरी जयस्तंभ येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने महिलावर्ग तसेच कार्यकर्ते उपस्थित होते, तसेत रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहाची लाट पाहायला मिळत आहे.