अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्यादिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंत म्हणाले की, "शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली चालत आहे. यावर जनतेच्या न्यायालयाने म्हणजेच मतदारांनी शिक्कामोर्तब केलं आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेने सिद्ध केलं असताना देखील काही लोकांच्या पचनी पडत नाही. 'तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहीले धुपाटणं अशी काही लोकांची परिस्थिती आहे. उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला. सध्या त्याच्याकडे धुपाटणं सुद्धा राहिलं नाही."
पुढे सामंत म्हणाले की, "उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कॉंग्रेसच्या तालावर नाचत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट कॉंग्रेसमय झाले असल्याची जनतेला माहिती आहे. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितले होते की, कॉंग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल, त्यावेळी मी शिवसेना बंद करेन, अशा कॉंग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचा काही लोकांनी निर्णय घेतला आहे. ही खऱ्या अर्थाने गद्दारी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय जनतेच्या पचनी पडला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 पैंकी 60 उमेदवार हे निवडून आले, याची देखील काही लोकांनी नोंद घेतली पाहिजे." असे, शिवसेना गटाचे नेते उदय सांमत यांनी म्हटले आहे.