शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्यासोबत भविष्यात युती होण्याच्या शक्यतेबाबत भाष्य केलं. हिंदी सक्तीविरोधात दोघांनी एकत्र येत मोर्चा काढला आणि सरकारला निर्णय मागे घ्यायला लावला. या यशस्वी एकत्रित लढ्याचं समर्थन करत उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या एकतेचा जोरदार मुद्दा उपस्थित केला.
या आंदोलनानंतर मुंबईत मोठा विजयी मेळावा पार पडला. 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर आलेल्या ठाकरे बंधूंमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली – "राज आणि उद्धव पुन्हा एकत्र येणार का?" या चर्चेला आता स्वतः उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
"आम्ही एकत्र आलो, कुणाला त्रास होतोय?"
"मी आणि राज एकत्र आलो, त्याचं कुणाला दुख: झालंय का? ज्यांना त्रास होतोय त्यांनी त्यावर विचार करावा. आम्ही का विचार करायचा?" असं सांगत उद्धव ठाकरे यांनी या एकत्रिततेचं स्वागत केलं. "हिंदी भाषिक, गुजराती भाषिक, मुस्लिम बांधवांनीही आमचं कौतुक केलं आहे. त्यामुळे कोणाला ‘पोटशूळ’ झाला असेल, तर आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो", असं त्यांनी स्पष्ट केलं.
"मी सकारात्मकतेकडे बघतो"
"देशभरात आमचा मेळावा गाजला, त्यातून महाराष्ट्रापुरता नाही तर इतर भाषिकांचाही सहभाग आणि आनंद दिसून आला. मुंबईतल्या अमराठी नागरिकांनीही असं सांगितलं की, 'असंच लढलं पाहिजे'. त्यामुळे मराठी माणूस जेव्हा आपल्या हक्कासाठी एकत्र येतो, तेव्हा त्याचा परिणाम सगळ्यांवर सकारात्मक होतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"राज ठाकरे यांच्याशी चर्चा होईल"
संजय राऊत यांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "प्रत्येक गोष्टीत राजकारणच आणायचं असं नाही. पण मराठी भाषेच्या प्रश्नावर, मराठी अस्मितेसाठी जे काही करावं लागेल ते करण्याची माझी तयारी आहे. त्या दृष्टीने राज ठाकरेंशी पुढील काळात चर्चा होईल. 20 वर्षांनी आम्ही पुन्हा एकत्र आलो, हेच मोठं पाऊल आहे. त्यामुळे माझं भाषण महत्त्वाचं नाही, तर आमचं एकत्र दिसणं हेच खूप महत्त्वाचं आहे", असंही त्यांनी सांगितलं.
"आता आम्ही उघड भेटू शकतो"
राज ठाकरेंशी थेट चर्चा करणार का, यावर स्पष्ट उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "हो, आता मी त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो. आम्ही उघडपणे भेटू शकतो. अडचण काय आहे? बाकीचे लोक चोरून भेटतात, आम्ही तसं करत नाही. जर भेटायचं असेल तर उघड भेटतो."
"भाजप मराठी विरुद्ध इतरांची फूट पाडतो"
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर भाजपवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्य असा संघर्ष पेटवण्याचं काम भाजप करत आहे. पण आम्ही कोणावरही आमची भाषा लादत नाही, मग तुम्हीही आमच्यावर कोणतीही भाषा लादू नका. प्रत्येक भाषेचा मान राखला पाहिजे. पण जेव्हा देश म्हणून विचार करतो, तेव्हा आपण सर्व हिंदू एक आहोत."