Shivsena Second Dussehra Melava Raj and Uddhav Thakarey : शिवसेनेतील फुटीनंतर गेल्या दोन वर्षांपासून दसरा मेळाव्यावरून राजकीय चुरस रंगत आहे. शिवाजी पार्कवरून कोणाचा मेळावा होणार, शक्तीप्रदर्शन किती होणार आणि कोणाचे भाषण लक्षवेधी ठरणार यावर साऱ्यांचे लक्ष असते. यंदाही हीच उत्सुकता कायम आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाने दसऱ्याच्या मेळाव्याचा दुसरा टिझर नुकताच प्रदर्शित केला आहे. "परंपरा महाराष्ट्राची, मैदान शिवतीर्थाचं, आवाज शिवसेनेचा, नेतृत्व ठाकरेंचं" या घोषवाक्याभोवती बांधलेला हा टिझर आता चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, उद्धव आणि राज ठाकरे यांचे सध्या वाढलेले संपर्क पाहता यंदाच्या मेळाव्यात मनसेप्रमुखही उपस्थित राहतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील दोन वर्षांत उद्धव गट आणि शिंदे गट यांनी शिवाजी पार्कवरून आपापला राजकीय जोर दाखवला. यावेळी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा प्रचंड गर्दी जमवण्याच्या तयारीत आहेत.याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, दहा वर्षांतील सर्वात मोठ्या उपस्थितीची नोंद होईल, अशी शक्यता आहे.
दरम्यान, मराठवाडा भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. जनजीवन विस्कळीत झाले असून, जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या संकटावर ठाकरे मेळाव्यात सरकारवर हल्लाबोल करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
जुलै 2025 मध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यापासून दोघांमध्ये चर्चांची मालिका सुरू आहे. दसरा मेळाव्यात त्यांची जोडी खऱ्या अर्थाने पुन्हा एकत्र दिसेल का, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात गाजतो आहे. मात्र, याबाबत अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.