नुकतेच लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले असून आता विविध स्तरातून त्यावर प्रतिक्रिया उमटतं आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला आहे. किरेन रिजीजू यांनी लोकसभेत विधेयक मांडले असून उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, "किरेन रिजीजू यांनी गोमांस खाण्याचे समर्थन केले होते. ते लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडत आहेत. हा योगायोग आहे. लोकांना झुजवायचं आणि राजकीय पोळी भाजायची, असे सत्ताधारी करत आहेत. सुधारणा विधेयकामध्ये काही मुद्दे चांगले आहेत. पण त्यात मुस्लिम यांविषयी काय ?, वक्फ बोर्ड जमिनी तुम्ही ताब्यात घेणार असे म्हणतायं, म्हणजे त्यावर जमिनींवर तुमचा डोळा आहे. मोहम्मद जिन्नालाही लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू घेणारी भाषणं अमित शाहसह त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांनी या विधेयकावर केली आहे," असा टोला ठाकरे यांनी लगावला.
"अमेरिकेने भारताला सांगितले होते की कर कमी करावे, नाहीतर आम्हीही कर लादू. याची सुरुवात झाली आहे याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून वक्फ विधेयक मांडले गेले," असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. पुढे ठाकरे म्हणाले की, "भाजपचं काय चाललंय कळत नाही. कधी सांगतात औरंगजेबाची कबर खोदा, यांचे लोक कुदळ, फावडी घेऊन जातात मग वरुन आदेश येतो की थांबा खोदू नका. मग परत माती टाकतात. मशिदीत घुसून मारणार सांगतात, मारायला गेलं की सांगायचं थांबा, 'सौगात ए मोदी' घेऊन जा. लोकांना एकमेकांमध्ये लढवायचं आणि त्यावर आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हे चाललं आहे. आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत."