शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर ठाकरेंची सेना आक्रमक झाली आहे. बाळापूरचे शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनीही निलम गोर्हे यांच्या विरोधात खळबळजनक दावा केला आहे.
अकोला महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा उल्लेख करत देशमुख म्हणाले की, येथील तत्कालीन विधान परिषदेचे जे आमदार होते. त्यांनी अकोला महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भात विधान परिषदेत आवाज उचलला होता. त्यावेळी स्वत: नीलम गोऱ्हे यांनी हा प्रश्न दडपण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.
नीलम गोऱ्हेंनी आपल्याला बोलावत या प्रकरणात मांडवली करण्याचा प्रस्ताव दिल्याचं देशमुख यांनी सांगितलं. दोन वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. आपण गोऱ्हे यांच्या प्रस्तावाला विरोध करत नकार दिला असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या होत्या नीलम गोऱ्हे?
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी हे विधान केलं. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावरुन आता विविध प्रतिक्रिया येत आहे.