मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे ओसंडून वाहणारे दुःख, त्यावर सरकारची नाकारणारी भूमिका आणि आश्वासनांच्या गप्प गप्प कहाण्या याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. करजखेडा (ता. गेवराई) येथे झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना ठाकरे म्हणाले, “सातबारा कोरा करा म्हणणारे फडणवीस आज कुठे आहेत? सातबारा कोरा म्हणणारा कुठे गेला रे चोरा?”
ही टिप्पणी करताना ठाकरे यांनी थेट फडणवीसांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या जुन्या ऑडिओ क्लिपचा उल्लेख केला. त्या क्लिपमध्ये फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्याचे आश्वासन दिले होते, पण आजपर्यंत ते आश्वासन पूर्ण झाले नाही, अशी टीका करत ठाकरे म्हणाले “फसव्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे स्वप्न दाखवून मतं मागितली, पण आता त्यांच्या आयुष्यावर संकट आलं तरी सरकार गप्प आहे.”
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, “कर्जमाफी करा हा काही टोमणा नाही, तर हा शेतकऱ्यांचा न्यायाचा आवाज आहे.” त्यांनी सांगितले की, जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही, पीकविम्याचा हक्क मिळत नाही, तोपर्यंत महायुतीला मत देऊ नका. शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना सरकारच्या निर्णयात संवेदनाच नाही, असं ते म्हणाले. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टीका सहन करू शकत नाहीत. पण आम्ही टीका करत नाही, आम्ही वास्तव सांगतोय. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बोलणं हा गुन्हा नाही,” असे म्हणत ठाकरे यांनी सरकारला आरसा दाखवला.
मराठवाड्यात गेल्या दोन महिन्यांपासून अतिवृष्टी, ढगफुटी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी सरकारने जाहीर केलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या मदतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकार आकडे सांगतं, पण गावोगावी फिरल्यानंतर वास्तव वेगळं दिसतं, असेही त्यांनी नमूद केले. “शेतकऱ्यांचे शिवार वाहून गेले, पण सरकारच्या संवेदना वाहून गेल्या,” असे ते म्हणाले.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी केवळ सरकारवरच नाही तर स्वतःच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख करत भावनिक सूर लावला. ते म्हणाले “मी केवळ विरोधी पक्ष म्हणून आदळआपट करत नाही. माझा उद्देश राजकारण नाही, तर शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवणं आहे. माझं पक्ष चोरलं, चिन्ह चोरलं, पण माझी माणसं जाग्यावर आहेत,ती तुम्ही चोरू शकत नाही.” “मी माझं कर्तव्य म्हणून कर्जमाफी केली होती, उपकार म्हणून नाही. आज माझ्याकडे काही नाही, तरी माझ्याकडे ताकद आहे, ती म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची.”
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांचे पीक आणि जमिनी वाहून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे म्हणाले, “नुसती शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेली नाही, तर त्यांचं आयुष्यच वाहून गेलं आहे. या वाहून गेलेल्या आयुष्याला आपण आधार दिला नाही, तर पुढे काय करणार?”त्यांनी सरकारवर आरोप केला की, “यांना सगळं माहित आहे,कुठे काय जातंय, कोणाची जमीन किती वाहून गेली आहे, पण तरीही ते ढापणार आहेत. शेतकऱ्यांच्या वेदना नोंदवूनही उपाय होत नाहीत.”
“मुख्यमंत्री व्यस्त आहेत, कारण ते बिहारमध्ये आहेत. इथले शेतकरी टाहो फोडतायत आणि ते तिकडे म्हणतात ‘ये अंदर की बात है, बिहारवर PMचं प्रेम आहे!’” “इथल्या बहिणींना दीड हजार देऊन मतं मिळवली आणि विसरले, पण बिहारमध्ये १० हजार दिले. महाराष्ट्रातल्या बहिणींच्या हक्काचं काय? बँकेचा फायदा शेतकऱ्यांना होऊ न देता कसा फायदा होणार, हे मुख्यमंत्री सांगणार का?” या वक्तव्यातून ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोघांनाही लक्ष्य केलं.
“राज्यातील शेतकरी संकटात आहे, त्यांची व्यथा मी रोज ऐकतोय. मी सरकारमध्ये नसल्याने मी काही करू शकत नाही असं नाही; माझं कर्तव्य आहे त्यांच्या सोबत राहणं. कारण ही ताकद जनतेने दिली आहे, ती कोणीही हिरावू शकत नाही.” या कार्यक्रमाला माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या संवादातून ठाकरे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं.