राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 75 वर्षांनंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्त होण्याचा सल्ला दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "आफ्टर मोदी?" या प्रश्नावर भाष्य करत भाजप आणि संघाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगतानाच, देशाला पक्षनिष्ठ नव्हे तर राष्ट्रनिष्ठ नेतृत्व हवे असल्याचे त्यांनी नुकत्याच सामनाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच केलेल्या निवेदनात 75 वर्षांनंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्त होण्याचा विचार व्यक्त केला होता.
त्यांच्या या वक्तव्याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला जात आहे. त्यामुळेच "मोदींच्यानंतर कोण?" हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची दैनिक सामना मधील मुलाखतीतील प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "‘आफ्टर मोदी हू?’ हा प्रश्न भाजप व संघाचा अंतर्गत विषय आहे. पण जर मोहन भागवत यांनी बोलले असेल, तर ते नक्कीच एखाद्या उत्तराच्या आधारेच बोलले असतील. ते विनाकारण वक्तव्य करत नाहीत.
त्यामुळे या सूचनेमागे संघाच्या पातळीवर मोदींच्या निवृत्तीचा विचार सुरू झाला असेल, असं वाटतं." उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेतृत्वावर टीका करत म्हटलं, "आज भाजपकडे पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत, संरक्षण मंत्री आहेत. पण देशाला खऱ्या अर्थाने हे पदाधिकारी नाहीत. देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर कमकुवत ठरताना दिसते. एका दुसऱ्या देशाचा राष्ट्रप्रमुख आपल्याला दहशतवादाविरुद्धची लढाई थांबवायला सांगतो आणि आपण व्यापारासाठी गप्प बसतो. देशाच्या प्रतिष्ठेपेक्षा सत्ता आणि निवडणूक यांचाच व्यापार सुरू आहे."
मोदींच्या 75 वर्षांनंतर निवृत्त होण्याच्या संभाव्यतेवर बोलताना ठाकरे म्हणाले, "संघानेच 75 वर्षांनंतर निवृत्तीचा नियम आखला आहे. मग मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग यांनाही पदांवरून बाजूला केलं. त्या नियमाची अंमलबजावणी स्वतः मोदींवर होईल का? याचं उत्तर लवकरच मिळेल. बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले – असं असावं की नाही?" "पण जर मोदी निवृत्ती घेत असतील, तर 'आफ्टर मोदी' ही चर्चा अपरिहार्य आहे. मात्र, ही चर्चा आता त्यांनीच ‘अंतर्गत विषय’ म्हणून हाताळली आहे. त्यामुळे उत्तर तयार असल्याशिवाय भागवतजीने वक्तव्य केलं असं मला वाटत नाही," असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं.
राजकीय पुढाकाराबाबत विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "लोकशाहीमध्ये बहुमत मिळाल्यावर जो नेता असतो तो पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतो. मात्र, एकदा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री झाल्यावर तो फक्त पक्षाचा नसतो. तो देशाचा किंवा राज्याचा प्रतिनिधी असतो. आज ही भूमिका बाजूला ठेवली जात आहे. हीच देशाची शोकांतिका आहे." देशाचे नेतृत्व कोणाकडे असावे, यावर स्पष्ट विचार मांडताना ठाकरे म्हणाले, "नेतृत्व कोणाचे असावे यापेक्षा, ते राष्ट्रहितासाठी काम करणारे असावे, हे महत्त्वाचं आहे. पक्षासाठी नव्हे, तर देशासाठी काम करणारा पंतप्रधान हवा. ही मानसिकता तयार होणे अत्यावश्यक आहे."
मोहन भागवत यांच्या सूचनेमुळे ‘आफ्टर मोदी’ या चर्चेला चालना मिळालेली असताना, उद्धव ठाकरे यांनी ती चर्चा फक्त राजकीय नव्हे तर देशहिताशी जोडत विचार मांडले आहेत. त्यांनी दिलेल्या परखड आणि तर्कसंगत प्रतिक्रियेमुळे भाजपच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मोदींची निवृत्ती आणि त्यानंतरचं नेतृत्व – हा प्रश्न सध्या तरी ‘अंतर्गत विषय’ असला, तरी त्याचे दूरगामी परिणाम देशाच्या राजकारणावर निश्चितच जाणवतील.