राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांचे अखेर बिगूल वाजले असून, निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या ठरणार असल्याने मुंबईसह राज्यभरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी खेळलेली एक मोठी राजकीय चाल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबईत सत्ताधारी महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र दुसरीकडे विरोधकांच्या गोटातून महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे यांच्यात मुंबई महापालिकेसाठी युती होण्याची जोरदार शक्यता आहे. जर हे तिन्ही पक्ष एकत्र आले, तर महायुतीसमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहू शकतं.
विशेष म्हणजे, शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपल्या कोट्यातून जागा देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती आहे. यामुळे या संभाव्य युतीला अधिक बळ मिळालं आहे. याचबरोबर, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील युती हा मुंबईच्या राजकारणात नवा आणि लक्षवेधी प्रयोग ठरणार आहे. अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच राजकीय व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
मात्र, या युतीच्या घोषणेला सध्या जागावाटपाचा तिढा अडथळा ठरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेची भूमिका स्पष्ट असून जोपर्यंत जागावाटपावर अंतिम तोडगा निघत नाही, तोपर्यंत युतीची अधिकृत घोषणा करू नये, असा आग्रह धरला जात आहे. विशेषतः सुमारे नऊ जागांवर अजूनही एकमत न झाल्याने चर्चा रखडलेली आहे. या जागांचा प्रश्न सुटताच शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागावाटप, प्रचाराची दिशा आणि संयुक्त रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
जर मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आले, तर भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीसमोर कठीण लढत उभी राहणार हे निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या हालचालीमुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापलं असून, येत्या काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.