विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दरे गावाला जात आहेत. यावरून विरोधकांनी टीका केली आहे. आता शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना जोरदार टोला लगावला. ते मुंबईतील अंधेरीत झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि आरएसएसवरही टीकास्त्र सोडले. “पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, भाजपचं वेगळं असतं. बाहेरच्या राज्यातून ९० हजार लोक आले. काही म्हणतात ते संघाचे कार्यकर्ते होते. पण आता ते ९० हजार कुठे गेले? जर ते संघाचेच होते, तर आता कुठे आहेत? मुलांना शाळेत प्रवेश हवा, रक्त हवे, हे आरएसएसवाले देतील का? जे बाहेरून आले, ते रक्तदान करतील की गोमूत्र दान करतील? गोमूत्रच देतील, तेच त्यांना जमतं. पण शिवसैनिक जातपात न पाहता रक्तदान करतो,” असे उद्धव म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मद्रास आयआयटीचे संचालक कामकोटी म्हणाले, तापाने त्रस्त होतो, तेव्हा गोमूत्र पिऊन बरा झालो. धन्य आहेत हे लोक. अशी माणसं शिकतात कशी? शिकून काय करतात?”
“गद्दारांना सांगतो, तुमचं आता काही चालणार नाही”
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून सांगितले, “मुंबईकर कधीच निष्ठूर होऊ शकत नाहीत. मावळे कधीच शिवसेनेशी गद्दारी करणार नाहीत. गद्दारांचा मेळावा वांद्र्यात सुरू आहे. आज गद्दार जिंकले असतील, पण त्यांना जिंकवणारे अमित शाह आहेत. अमित शाह आहेत तोपर्यंतच गद्दार टिकतील. त्यांनी बेकायदेशीर यंत्रणा वापरून विजय मिळवला. मात्र महापालिकेच्या निवडणुका येऊ द्या, गद्दारांची काय अवस्था होईल ते बघाच.”
"रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातील आसू..."
ठाकरेंनी शिंदेंवर थेट हल्ला चढवत म्हणाले, “अडीच वर्षे तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचा मान दिला होता. पण आता सत्ता गेली आहे. मंत्रीपद मिळालं नाही, दावोसला नेलं नाही, मग गावी निघून गेलात. रुसलेल्या बाईसारखे वागताय. डोळ्यातून आता अश्रू दिसू लागले आहेत.”
“हिंदुत्व सोडलेले नाही”
हिंदुत्वावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “विधानसभेत आपण गाफील राहिलो, त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. पण आपण हिंदुत्व कधीही सोडलेलं नाही. चेंबूरच्या चिता कॅम्पमध्ये मी भाषण केलं. तिथे मुस्लिम बांधव होते. मी त्यांना विचारलं, ‘माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का?’ त्यावर त्यांनी होकार दिला. त्यामुळे माझं हिंदुत्व कायम आहे, त्याबद्दल कुणालाही शंका घेण्याची गरज नाही.”
ठाकरेंनी गद्दारांवर हल्ला चढवत स्पष्ट केले की, जनता आणि शिवसैनिक यांच्या ताकदीवर ते लढत राहणार आहेत.