सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत मंगळवारी मोठी घडामोड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज सूचकाची सही नसल्याच्या कारणावरून अवैध ठरवण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी हे तांत्रिक कारण मान्य करत अर्ज फेटाळला. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी या त्रुटीवर आक्षेप घेतला होता.
अनगर परिसरात या निर्णयाने मोठी चर्चा रंगली आहे. अनेक वर्षांपासून अनगरच्या राजकारणावर प्रभुत्व असलेल्या माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात होती. अनगर ग्रामपंचायत प्रथमच नगरपंचायतीत रूपांतरित झाल्याने सत्ता टिकवण्यासाठी पाटील यांच्या गटाने जोर लावला. दुसरीकडे थिटे यांनी आरोप केला होता की आपला अर्ज भरू नये म्हणून अडथळे निर्माण करण्यात आले; त्यामुळेच त्यांनी पहाटे पाच वाजता पोलिस सुरक्षा घेऊन अर्ज दाखल केला होता. दरम्यान, नगरपंचायतीच्या १७ जागांवर कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने अर्ज दाखल न केल्याने त्या जागा राजन पाटील यांच्या पॅनेलच्या नावावर बिनविरोध गेल्या. नगराध्यक्षपदासाठी पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. छाननीदरम्यान थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने प्राजक्ता पाटील यांचा विजय निश्चित झाला.
अचानक झालेल्या या निर्णयावर उज्वला थिटे यांनी नाराजी व्यक्त केली. “सूचक म्हणून माझ्या मुलाची सही कशी गायब झाली? मी सर्व कागदपत्रे वकिलांकडून तपासून घेतली होती. इतक्या संघर्षानंतर अर्ज दाखल केला आणि आता तो तांत्रिक कारणावरून बाद? याचा खुलासा मिळावा म्हणून मी न्यायालयात जाणार,” असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनीही प्रशासनावर सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी केली. “सही अधिकाऱ्यांसमोरच करण्यात आली होती. तरीही ती दिसली नाही, हे कसे शक्य आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अनगरच्या राजकारणात या घटनेने मोठी खळबळ माजली असून पुढील पावले काय घेतली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.