Big decision by the UK Government : ब्रिटनमध्ये मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी मोठ्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून, त्याचा थेट परिणाम Apple आणि Google सारख्या टेक दिग्गजांवर होण्याची शक्यता आहे. “वयाची खात्री झाल्याशिवाय एडल्ट फोटो पाहता किंवा शेअर करता येणार नाहीत” असा नवा नियम आणण्याचा यूके सरकार विचार करत असल्याची चर्चा सध्या जोरात आहे.
आतापर्यंत एडल्ट कंटेंटवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रामुख्याने वेबसाइट्स आणि अॅप्सवर होती. मात्र आता ही जबाबदारी थेट डिव्हाइस लेव्हलवर नेण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच, iOS आणि Android फोनवर वापरकर्त्याची वयाची खात्री (Age Verification) झाल्याशिवाय अशा स्वरूपाचा मजकूर उघडणारच नाही, अशी व्यवस्था लागू होऊ शकते.
Financial Times च्या वृत्तानुसार, ब्रिटन सरकार Apple आणि Google यांच्याशी याबाबत चर्चा करण्याच्या तयारीत आहे. हे नियम लागू झाल्यास, स्मार्टफोन वापरण्याची सध्याची पद्धतच बदलू शकते. सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी नियामक पातळीवर हालचाली वेग घेत असल्याचे संकेत मिळत आहेत.
एज वेरिफिकेशनचा मुद्दा सध्या जागतिक पातळीवर चर्चेत आहे. सोशल मीडिया कंपन्या आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणल्यामुळे, इतर देशही कठोर धोरणांचा विचार करू लागले आहेत.
हा प्रस्ताव UK Online Safety Act शी सुसंगत असल्याचे सांगितले जात आहे. या कायद्यानुसार, अश्लील मजकूर देणाऱ्या वेबसाइट्ससाठी वय तपासणी आधीच बंधनकारक आहे. यूकेचा नियामक Ofcom याबाबत स्पष्ट आहे “फक्त 18 वर्षांवरील असल्याचे बॉक्स टिक करणे पुरेसे नाही.”
Apple आणि Google यांनी सध्या या विषयावर मौन बाळगले आहे. मात्र, हा नियम प्रत्यक्षात आला तर तो युजर प्रायव्हसी, तंत्रज्ञानाची जबाबदारी आणि सरकारी नियंत्रण या तिन्ही बाबींवर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. ब्रिटनचा हा निर्णय पुढील काळात जगभरातील डिजिटल धोरणांसाठी दिशादर्शक ठरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.