भारतीय जनता पक्षाच्या नवीन महाराष्ट्र राज्य मुख्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सोमवारी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाह हसत म्हणाले, “तुम्ही डबल इंजिन सरकारने खुश असाल, पण मी नाही… मला महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे.”
शाह यांच्या या विधानामुळे उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य मिश्रित कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. मात्र त्यांनी दिलेला संदेश स्पष्ट होता. भाजपाचे लक्ष्य केवळ सत्तेपुरते मर्यादित नसून संघटनाचा विस्तार आणि शासन व्यवस्थेची मजबुती हेही पक्षाचे ध्येय आहे.
कार्यक्रमादरम्यान शाह यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर, भाजपच्या संघटनात्मक शक्तीवर आणि पक्षाच्या विचारधारेवर स्पष्ट भाष्य केले. त्यांनी म्हटले की, भारतामध्ये आता परिवारवादाचे राजकारण चालणार नाही. भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी असून, समर्पण आणि कष्टाच्या जोरावर कोणताही कार्यकर्ता उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
शाह यांनी असेही सांगितले की, महाराष्ट्रात भाजपा-नेतृत्वाखालील सरकार अधिक कार्यक्षम आणि वेगवान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकसंध विचारांची सत्ता असल्यास विकासाची गती अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवीन मुख्यालयामधून पक्षाच्या संघटनाला बळ मिळणार असून, राज्यातील कार्यपद्धती अधिक मजबूत होईल, असेही शाह यांनी सांगितले. महाराष्ट्रात भाजप मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.
या भूमिपूजन कार्यक्रमाला राज्यातील मुख्यमंत्री यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.