मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, १३ मे पर्यंत एकूण २,५११ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. फळबागा, भाजीपाला, मोसंबी, आंबा, मका यांसारख्या उन्हाळी पिकांचा समावेश आहे.
जालना जिल्ह्यात सर्वाधिक फटका
या नुकसानीमध्ये जालना जिल्ह्याचे सर्वाधिक १,९२३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याखेरीज छत्रपती संभाजीनगर (३९८ हेक्टर), नांदेड (१७३ हेक्टर), हिंगोली (२९ हेक्टर), लातूर (२७.२० हेक्टर), परभणी (२७ हेक्टर) आणि बीड (१६.६० हेक्टर) जिल्ह्यांमध्येही नुकसानाची नोंद आहे.
पावसामुळे १७ हेक्टर जिरायती, १,४८० हेक्टर बागायती आणि १,०१८ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून भरपाईची मागणी अधिक तीव्र होत आहे. १ ते १२ मे या कालावधीत विजा कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर व नांदेडमधील प्रत्येकी २, बीडचे ३ आणि लातूर १ या नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय विजेमुळे १४ जनावरे दगावली असल्याची माहितीही समोर आली आहे.
एप्रिल महिन्यातही मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे ३,०२६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. मात्र या नुकसानीचा अंतिम अहवाल अद्याप शासनाकडे पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्य शासनाने त्वरीत नुकसानग्रस्तांना भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.