भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील विविध भागांसाठी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला असून पुढील ४८ तास हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसासोबतच बर्फवृष्टी, धुकं आणि जोरदार वाऱ्यांचा तडाखा बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या दोन पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाले आहेत.
या हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसासोबत मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस या भागात हवामान खराब राहणार असून ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या काळात जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
याचबरोबर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये देखील ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांमध्ये पाऊस, बर्फवृष्टी आणि जोरदार वारे असा तिहेरी परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला असून त्यामुळे रस्ते वाहतूक तसेच रेल्वे आणि हवाई सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशात ७ फेब्रुवारी रोजी धुक्याचा प्रभाव अधिक जाणवणार असून दृष्टमानता कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर-पश्चिम भारतात पुढील दोन ते तीन दिवस २० ते ३० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे काही भागात थंडीचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यात सध्या पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील काही भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार असून ग्रामीण आणि डोंगराळ भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवू शकते. दुसरीकडे मुंबई आणि समुद्र किनारी भागात मात्र तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाडा आणि उन्हाचा चटका जाणवू शकतो.
कोकण आणि मराठवाडा विभागात तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भात देखील पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून तापमानात थोडी वाढ होऊ शकते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये थंडीचा प्रभाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामानातील या बदलांमुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.