ऐन एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने उन्हाच्या झळाळीने त्रासलेल्या नागरिकांना काही प्रमाणात गारवा अनुभवता आला. मात्र अवेळी आलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. राज्यातील विविध ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, भिवंडीसारख्या शहरांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले.
उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर या तीनही शहरात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे पाऊस पडेल अशी दाट शक्यता होती. त्यानंतर जोरदार अवकाळी पावसाला शहरात सुरुवात झाली. दरम्यान, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांना पावसात भिजून आपल्या इच्छित स्थळी पोहोचावो लागलो, तर काहींनी पावसापासून बचाव करण्यासाठी दुकानांच्या छताखाली आसरा घेतला.
कल्याणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
उन्हाच्या झळांनी लाहीलाही झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा मिळाला. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. तर वाढत्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला, पावसाला सुरूवात होताच शहरातील अनेक भागातील बत्ती गुल झाली होती. काही काळ पावसाने हजेरी लावत विश्रांती घेतली.
अवकाळी पावसामुळे भिवंडीतील नागरिकांची धावपळ झाली. पडघा, वडपे, दाभाड, लोनाड परिसरात धुळीचे वादळ निर्माण झाले. जोरदार वारा सुरू झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. तर नवी मुंबईमध्ये काही वेळासाठी वादळीवाऱ्यासह धुळीचा फटका बसला. अचानक झालेल्या जोरदार तुफानी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.