अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ 25 टक्क्यांपर्यंत वाढवली असून, रशियाशी व्यापाराच्या पार्श्वभूमीवर दंडात्मक उपाय योजले आहेत. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर सकाळी स्पष्टपणे जाणवला. मात्र, सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजाराने उसळी घेतली असून, दोन्ही प्रमुख निर्देशांक सध्या वाढीच्या मार्गावर आहेत.
ट्रेडिंगच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण झाली होती. सेन्सेक्स 80695.15 अंकांवर उघडला आणि काही काळानंतर त्यात सकारात्मक कल दिसून आला. दुपारी 1:30 च्या सुमारास सेन्सेक्स 220 अंकांनी वधारून 81703.01 पर्यंत पोहोचला.
निफ्टी 50 देखील सकाळी जवळपास 200 अंकांनी घसरून 24635 अंकांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर खरेदीचे प्रमाण वाढल्याने निर्देशांक सावरला आणि 77 अंकांची वाढ नोंदवत निफ्टी 24932.50 पर्यंत चढला. लार्ज कॅप शेअर्समध्ये हिंदुस्तान यूनिलीवर, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस, इंटरग्लोब एविएशन, ह्युंदाई मोटर इंडिया, युनायटेड स्पिरिट्स या कंपन्यांमध्ये चांगली तेजी दिसून आली.
दुसरीकडे, जिंदाल स्टील अँड पॉवर, झायडस, पीएनबी, अदानी एंटरप्रायझेस, आयओसीएल, छोलामंडलम इन्व्हेस्ट यांसारख्या स्टॉक्समध्ये घसरण अनुभवायला मिळाली. सध्या जागतिक घडामोडींचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे जाणवत असून, गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगून व्यवहार करणे गरजेचे आहे. अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या टॅरिफचा पुढील आर्थिक परिणाम आणि बाजारातील दिशा येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, स्थानिक आर्थिक घडामोडी, कॉर्पोरेट निकाल आणि जागतिक संकेत यांचा विचार करूनच बाजारात पुढील हालचाल ठरेल.