सध्या महाराष्ट्रात हिंदी–मराठी भाषेचा मुद्दा जोरदार गाजत असताना, आता या भाषिक वादाची झळ थेट खेळाच्या मैदानातही पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. देश, भाषा आणि संस्कृतीवर अभिमान व्यक्त करणं हा गुन्हा ठरतोय का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. एका भारतीय खेळाडूने आपल्या भाषेवर आणि देशावर अभिमान व्यक्त केल्यानंतर जे घडलं, ते केवळ खेळापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या सन्मानाशी जोडलेलं ठरलं. “भारत तुमचा बाप आहे” असा अहंकार नाही, तर भारताला कमी लेखू नका, भारताचा अपमान सहन केला जाणार नाही—हा स्पष्ट संदेश या घटनेतून समोर आला आहे. नेमकं काय घडलं, वाचा बातमी सविस्तर
नेमकं प्रकरण काय?
दुबई ड्युटी फ्री टेनिस स्टेडियममध्ये पार पडलेल्या मिसफिट्स बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा आंतरराष्ट्रीय बॉक्सर नीरज गोयत याने अमेरिकेच्या अँथनी टेलरचा ३–० असा दणदणीत पराभव केला. भारतीय तिरंग्याच्या तीन रंगांनी सजवलेला पोशाख परिधान करून नीरज रिंगमध्ये उतरला आणि पहिल्याच फेरीनंतर सामन्यावर वर्चस्व गाजवत सहा फेऱ्यांमध्ये ५९–५५, ५८–५६ आणि ६०–५४ अशा गुणफलकावर एकमताने विजय मिळवला. नीरजची मुलाखत घेण्यात आली नीरज गोयत हा हिंदी भाषेतून बोलू लागला. प्रेक्षक त्याच्या या भाषेला हसू लागले... त्यावेळेस नीरज म्हणाला की, मी एक भारतीय आहे.
माझी भाषा हिंदी आहे. त्यानंतर मात्र त्याने तोडकमोडक इंग्रजी बोलत आपली मुलाखत संपवली. त्याच संध्याकाळी नीरजच्या प्रतीस्पर्धी खेळाडू टेलरला पराभव सहन न झाल्याने तो संतप्त झाला. बॅकस्टेजमध्ये हस्तांदोलनाला नकार दिल्यानंतर त्याने नीरजवर पाण्याची बाटली फेकली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर परिस्थिती चिघळली, सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करावा लागला. ही घटना भारताचा खेळाडू केवळ ताकदीनेच नव्हे, तर आत्मसन्मानानेही उभा राहतो, हे दाखवणारी ठरली. भारताचा सन्मान राखणं ही आक्रमकता नव्हे, तर स्वाभिमान आहे. हाच संदेश यातून पुढे आला.