ताज्या बातम्या

Sachin Tendulkar : 'मतदानाचा नीट वापर करा' सचिन तेंडुलकरांचं नागरिकांना आवाहन

जागतिक कीर्तीचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आणि मतदानानंतर त्यांनी केलेले विधान सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Published by : Varsha Bhasmare

मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू आहे. या लोकशाहीच्या उत्सवात सामान्य नागरिकांसोबतच क्रीडा, कला आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तीही सहभागी होत आहेत. याच पार्श्वभूमीवर जागतिक कीर्तीचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आणि मतदानानंतर त्यांनी केलेले विधान सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. सचिन तेंडुलकर यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दांत आवाहन केले. “मी मतदान करायला आलोय. प्रत्येक मत मॅटर करतं. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की, येऊन मतदान करा. आपला विचार इथे येऊन मांडा. हीच योग्य वेळ आहे. मतदानाचा नीट वापर करा,” असे स्पष्ट आणि ठाम शब्दांत सचिन तेंडुलकर म्हणाले.

क्रिकेटच्या मैदानावर शिस्त, संयम आणि सातत्य यांचे उत्तम उदाहरण ठरलेले सचिन तेंडुलकर लोकशाहीच्या प्रक्रियेतही तितक्याच जबाबदारीने सहभागी होत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. मतदान हा केवळ एक अधिकार नसून लोकशाहीतील महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कोणताही बदल घडवायचा असेल, तर तो मतदानातूनच शक्य आहे. त्यामुळे घराबाहेर पडून मतदान करणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला.

आज मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची चांगली गर्दी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मतदार रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, तसेच पोलिस आणि होमगार्ड्सच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. सचिन तेंडुलकर यांसारख्या आदर्श व्यक्तींच्या सहभागामुळे मतदानाबाबत सकारात्मक वातावरण तयार होत असून, अधिकाधिक नागरिक मतदानासाठी बाहेर पडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, हा संदेश पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर यांच्या शब्दांतून ठळकपणे समोर आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा