माळशिरसचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. "पूर्वी आमचे लोक वाघाची शिकार करायचे, आता ससा खाऊन पोट भरतात," अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी आंदोलनानंतर केले. या विधानावर वन्यजीव प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, यामुळे जानकर यांच्या अडचणी वाढू शकतात अशी चर्चा आहे.
नीरा देवघर धरणातून पाणी मिळावे या मागणीसाठी जानकर यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन झाले होते. आंदोलनानंतर झालेल्या मटण पार्टीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना जानकर म्हणाले की, "वडापाव, केळी खाऊन लोक कंटाळले आहेत. डोंगरदऱ्यातील लोकांनी बोकड किंवा ससा खाल्ला तर त्यात चूक काय?"
जानकर यांनी पुढे असेही म्हटले की, "या भागातील लोक ऐतिहासिक लढायांमध्ये सहभागी झाले होते. पूर्वी ते वाघाची शिकार करायचे, आज दुष्काळाशी लढा देत आहेत. जर सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवला, तर लोकांना मटण खावे लागणार नाही; तेव्हा ते पुन्हा वडापाव, भोपळा, केळीवर समाधान मानतील. पूर्वी आमची लोकं वाघाची शिकार करायची. आता ताणून ससा धरुन खाणारी माणसं आहेत." या वक्तव्यामुळे वन्यजीव संरक्षण कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता मंत्री जयकुमार गोरे यांचा प्रतिसाद काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.