मुंबईत मनेस विरूद्ध उत्तर भारतीय वाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता दिसून येत आहे. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करावी, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर आता मनसे नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भैयांच्या मुंबईतील अस्तित्वावरच आता प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहेत.
काय आहे प्रकरण
सुनील शुक्ला म्हणाले की, "राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदू्ंना मारायचा आदेश दिला आहे, असं वाटतं. तुम्ही केवळ उत्तर भारतीयांचे नव्हे तर मराठी लोकांचेही विरोधक आहात. म्हणून मी तुमच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल केली आहे. तुम्ही संविधानाचे उल्लंघन करू शकत नाही. हिंदुंना तुम्ही मारू शकत नाही. आम्ही तुमचा विरोध करतो, निंदा करतो आणि सुप्रीम कोर्टातून तुमच्या विरुद्द आदेश आणणारच," असा इशारा सुनील शुक्ला यांनी दिला आहे.
संदीप देशपांडे यांचे प्रत्युत्तर
दरम्यान, मनसेचे मुंबई शहरध्यक्ष संदीप देशपांडे यांनी, "कुठला तरी भैय्या म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी. मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील, तर भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल. मुळात प्रादेशिक पक्षांना राज्यातून संपवण्याचं हे षडयंत्र भाजप करत असून उत्तर भारतीय विकास सेनेसारख्या संघटना हे त्यांचच पिल्लू आहे, त्यामुळे अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही," असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.