(Uttarakhand Heavy Rain ) राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. काही भागांत ढगफुटी, तर काही ठिकाणी भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी, यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने चारधाम यात्रा एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी पुन्हा एकदा हवामानाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.
भारतीय हवामान विभागाने उत्तराखंडमधील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, डेहराडून, टिहरी, पौडी, हरिद्वार आणि नैनिताल या जिल्ह्यांत 29 आणि 30 जून रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दिल्लीसह अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे.
हिमाचल प्रदेशातील सिमला हवामान केंद्राने राज्यातील 10 जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जाहीर केला असून रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलन जिल्ह्यातील कोटी भागात सिमला-कालका रेल्वेमार्गावर झाडे व दगड कोसळले. त्यामुळे युनेस्कोच्या जागतिक वारशात समाविष्ट असलेली ही ऐतिहासिक रेल्वेसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे शिमला-कालका राष्ट्रीय महामार्गावरही भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प झाली असून, काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विलासपूर, हमीरपूर, कांगडा, मंडी, सिमला, सोलन, सिरमौर, उना, कुल्लू आणि चंबा या जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने भूस्खलन, रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि आवश्यक सेवांमध्ये अडथळे येण्याचा इशारा दिला आहे. 20 जूनपासून आतापर्यंत राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 17 जणांनी जीव गमावला आहे.
दरम्यान, उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री महामार्गालगत एका ठिकाणी ढगफुटी झाल्यानंतर भूस्खलनामुळे बांधकाम करणाऱ्या कामगारांची निवासस्थाने वाहून गेली. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला असून सात जण अद्याप बेपत्ता आहेत. स्थानिक प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली असून, यमुना नदीच्या किनारी दोन मृतदेह सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. उत्तर भारतात सुरू असलेला पावसाचा कहर पाहता प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना गरज नसताना प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.