वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नव्या तपशीलांचा उलगडा झाला असून, 2022 मध्ये पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी निलेश चव्हाण यांना शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, निलेशला यापूर्वी ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हा परवाना नाकारला होता, हेही स्पष्ट झाले आहे.
या परवान्याच्या मंजुरीमागे कोणता राजकीय दबाव होता का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांचे नातेवाईक असल्याचेही आता उघड झालं आहे. इतकंच नव्हे तर, शशांक आणि सुशील हगवणे यांनाही शस्त्र परवाने देण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, निलेश चव्हाण याच्यावर यापूर्वी वारजे पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असून, त्याने कस्पटे कुटुंबावर पिस्तूल रोखल्याचा आरोप आहे. तसेच, 2019 मध्ये त्याच्यावर स्पाय कॅमद्वारे पत्नीचे व्हिडिओ शूट केल्याचा आरोप असल्याचेही तपासात समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, "मी जालिंदर सुपेकर यांच्याशी बोललो असून, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. पण या संदर्भातील चौकशीतून सर्व काही स्पष्ट होईल."
या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यातील नागरिकांचे आणि माध्यमांचे लक्ष लागले आहे. जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई होणार का?, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत निर्णयाची अपेक्षा व्यक्त होत आहे.