महाराष्ट्रातील पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण खूप चर्चेत आले आहे. या प्रकरणामध्ये नीलेश चव्हाणला अटक केली आहे. निलेशचा शोध त्याच्या मैत्रिणीमुळे लागला असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, निलेश जेव्हा पुण्यातून गायब झाला तेव्हा त्याच्याबरोबर त्याची एक मैत्रीण होती आणि तिच्या फोनचादेखील त्याने वापर केला होता.
निलेशच्या लोकेशनचा पहिला क्लु तिच्या घटस्फोटित मैत्रिणीमुळं लागल्याचं समोर आलंय. मात्र निलेशला अटक केलेल्या प्रकरणाशी तिचा काही संबंध नसल्याने चौकशीनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिला सोडून दिलं. निलेश पुण्यातून पसार झाला तेंव्हापासून ही मैत्रीण तिच्या सोबत होती अन दिल्लीतून ती पुण्याला परतली. आपण फिरायला जाऊ असं म्हणून निलेशने तिला सोबत ठेवलं अन तिच्या फोनचा वापर ही केला. अशातच पोलिसांचा एका व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होतं अन त्या व्यक्तीला निलेशने मैत्रिणीच्या नंबरवरून संपर्क साधला. त्यावेळी पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर प्राप्त झाला. तेंव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत होते. मात्र दिल्लीतून निलेश गोरखपूरच्या खाजगी बसमध्ये बसला अन त्याची मैत्रीण पुण्याला परतली.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची चौकशी केली, परंतु तिचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं आढळल्यानं तिला पोलिसांनी सोडून दिलं. मात्र तिच्याकडून दिल्लीतून गोरखपूरचा प्रवास केलेल्या खाजगी बसची माहिती मिळाली. ज्याचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय. हा पहिला क्लु मिळाला, त्यानंतर पोलीस नेपाळ कनेक्शनपर्यंत ही पोहचू शकले.