मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात रविवारी एका व्हॅनने दुचाकीला धडक देऊन विहिरीत पडल्याने दहा जणांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. मंदसौर येथे एका लग्न समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर रतलाम येथील कीर कुटुंबातील 12 सदस्य नीमच जिल्ह्यातील मानसा भागातील अंतरी माता मंदिरात दर्शनासाठी जात असताना दुपारी 1.15 वाजता बुढा-तकरवत फांटे येथे हा अपघात झाला. मृतांमध्ये व्हॅनमध्ये प्रवास करणारे एकाच कुटुंबातील आठ सदस्य, आबाखेडी गावातील रहिवासी दुचाकीस्वार गोबर सिंग आणि विहिरीतून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा ग्रामस्थ मनोहर सिंग यांचा समावेश आहे.
मंदसौरचे पोलीस अधीक्षक (एसपी) अभिषेक आनंद म्हणाले, "इको व्हॅनने एका दुचाकीस्वाराला धडक दिली आणि नंतर ती उघड्या विहिरीत पडली. गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. बचाव कार्यादरम्यान एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गोबर सिंगचाही मृत्यू झाला."