ताज्या बातम्या

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कळसूत्री बाहुला; ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ गुजरातला गेल्याने शिवसेनेचा संताप

Published by : Siddhi Naringrekar

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेनं भाजपा त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेवर हा खूप मोठा हल्ला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा नुकताच पैठण दौरा झाला. त्यांच्या गटाचे आमदार भुमरे यांचा हट्ट पुरविण्यासाठी मुख्यमंत्री पैठण यात्रेस गेले. तेथे एका मंडपात मुख्यमंत्र्यांची पेढे व लाडवांची तुला करण्याची योजना होती. त्यासाठी अनेक खोके भरून मिठाई तेथे आणली होती. शिंदे गटाचा खोक्यांशी संबंध जोडला जात असला तरी खोक्यातली मिठाई पाहून ‘तुला’ करण्याचे मुख्यमंत्र्यांनी नाकारले. त्यांनी मिठाईतुला नाकारताच त्या मांडवात जमलेल्या लोकांनी लाडू-पेढय़ांची अक्षरशः लूटमार केली. लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांसमोर लाडू-पेढे पळवून नेले. अगदी त्याच ‘लूटमार’ पद्धतीने गुजरातने महाराष्ट्रातला ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प पळवून नेला आहे,” असे शिवसेनेचा अग्रलेख सामनातून करण्यात आला आहे. ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ हा मोठा औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून खेचून गुजरातला नेल्याचे वृत्त धक्कादायक आहे. पुण्याच्या तळेगावजवळ ११०० एकर जमीन व इतर सवलती या उद्योगास देण्याचे महाविकास आघाडी सरकारने मान्यच केले होते. हा प्रकल्प महाराष्ट्रातच होईल असे कंपनीचे पक्के वचन होते. जूनपर्यंत तरी कंपनीचे मन बदलले नव्हते, पण महाराष्ट्रात एक बेकायदा सरकार विराजमान होताच किमान एक लाख लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प गुजरातला वळवला गेला आहे. “उद्या हे महाराष्ट्रातील जनावरांत पसरत असलेल्या ‘लम्पी’ आजाराचे खापरही आघाडी सरकारवर फोडतील. स्वतःच्या घरी पाळणा हलत नाही, मग ज्यांच्या घरी हलतोय त्यांच्या नावाने बोटे मोडायची किंवा जादूटोणा करायचा अशा वृत्तीची अवलाद महाराष्ट्राच्या नशिबी यावी हे दुर्भाग्य नाही तर काय? आज एक लाख नोकऱ्या देणारा वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प या लोकांनी दुसऱ्या राज्यात जाऊ दिला. पाठोपाठ महाविकास आघाडी सरकारने कसोशीने पाठपुरावा केलेला ‘बल्क ड्रग पार्क’ हा आणखी एक मोठा प्रकल्पही महाराष्ट्राने गमावला आहे.असे शिवसेनेनं म्हटले आहे.

आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले. तुमच्या आमदारांना पाच-सहाशे खोके दिले. त्या बदल्यात मुंबई-महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हाती द्या’, असा हा सरळ सरळ सौदा दिसतो. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले; पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपावालेच आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे,” असा सल्ला देखिल मनसेला शिवसेनेने दिला आहे. “मुंबई, महाराष्ट्राचे महत्त्व राहू नये यासाठीच भाजपाने शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पैठणच्या भाडोत्री सभेत वल्गना केली की, शिवसेनेने मराठी माणसाचे नुकसान केले. अर्थात मुंबईतून मराठी माणूस कमी का झाला, या प्रश्नाचे उत्तर आता त्यांनीच दिले आहे. वेदान्त-फॉक्सकॉनसारखे प्रकल्प मुंबई, महाराष्ट्रातून खेचून नेले जात असताना मुख्यमंत्री दाढीची खुंटं उपटत बसल्यानेच मराठी माणसाचे नुकसान झाले आहे. शिवसेनेवर खापर फोडणाऱ्यांनी मुळात हा विचार केला पाहिजे की, जर शिवसेना नसती तर आजचे मुख्यमंत्री तरी कुठे असते?” असा शिवसेनेतून टोला लगावण्यात आला आहे.

शिंदे गटाच्या पाठीमागे असलेल्या महाशक्तीने महाराष्ट्राशी उभा दावा मांडला आहे. शिंदे मात्र सर्व खापर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर फोडून स्वतःचे अपयश झाकत आहेत. शिंदे यांचे नाव बदलून यापुढे श्रीमान खापरफोडे असेच ठेवायला हवे. महाराष्ट्राने डोळे उघडे ठेवून पावले टाकायला हवीत,” अशी टीका शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.

CNG : पंपांवर सीएनजीचा तुटवडा; गेल्या 3 दिवसांपासून गॅस उपलब्ध नाही

Health Tips: बदलत्या ऋतुमध्ये अशा प्रकारे घ्या स्वतःची काळजी

Sanjay Shirsat: श्रीमंत लोकांच्या माजलेल्या मुलांवर...; काय म्हणाले संजय शिरसाट?

Vijay Wadettiwar: पुण्यातील हिट अँड रन केस घटनेची न्यायिक चौकशी व्हावी; विजय वड्डेटीवार यांची मागणी

Dadar : दादरमधील इगो मीडिया कपनीचे होर्डिंग हटवले; होर्डिंग हटवले मात्र सांगडा कायम