मराठी नाट्यसृष्टी आणि छोट्या पडद्यावर आपल्या सहजसुंदर अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं आहे. पार्ले येथील राहत्या घरी त्यांनी आज सकाळी 10.15 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कन्या स्वाती कर्वे यांनी या दु:खद वार्तेची माहिती एका पोस्टद्वारे दिली. 25 ऑगस्ट 1930 रोजी जन्मलेले बाळ कर्वे यांनी अनेक नाटकांतून आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती 1979 मध्ये प्रसारित झालेल्या चिं.वि. जोशी यांच्या ‘चिमणराव’ मालिकेतील ‘गुंड्याभाऊ’ या भूमिकेमुळे. या पात्रामुळे त्यांना लोक आजही ओळखतात. “विलेपार्ल्यातून फिरताना लोक मला गुंड्याभाऊ म्हणतात,” असं ते अभिमानाने सांगायचे.
त्यांचा नाट्यप्रवास विजया मेहता आणि विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. त्यांनी लालन सारंग यांच्यासोबत ‘रथचक्र’, भक्ती बर्वेसोबत ‘मनोमनी’, ‘आई रिटायर होते’, तसेच डॉ. गिरीश ओकांसह ‘कुसूम मनोहर लेले’ यांसारखी गाजलेली नाटके केली. खरंतर ‘गुंड्याभाऊ’ ही भूमिका सुरुवातीला शरद तळवलकर यांना द्यायचा विचार होता, मात्र अखेरीस बाळ कर्वेंना ही संधी मिळाली आणि त्यांनी ती अजरामर केली.
अभिनयासोबतच ते शिक्षणाने अभियंता होते. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून 32 वर्षे नोकरी केली. नाटकाची आवड जोपासताना त्यांनी सुमंत वरणगांवकर यांच्यासोबत ‘किलबिल बालरंगमंच’ ही संस्था स्थापन केली आणि अनेक बालनाट्ये रंगमंचावर आणली. बाळ कर्वे यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन विश्वाने एक बहुमूल्य रत्न गमावलं आहे. त्यांचं ‘गुंड्याभाऊ’ पात्र रसिकांच्या स्मरणात कायम जिवंत राहील.