सध्या बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' चित्रपट खूप चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊ चौदा दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही बॉक्स ऑफिसवर अजूनही या चित्रपटाची जादू बघायला मिळते. या चित्रपटामध्ये विकीव्यतिरिक्त रश्मिका मंदना, अक्षय खन्ना हे मुख्य भूमिकेत बघायला मिळत आहेत. चित्रपट प्रदर्शनानंतर तीन दिवसांतच 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे अनेक हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड्स मोडीत काढले होते. अशातच आता या चित्रपटाने नवीन विक्रम केला आहे.
'छावा'ने आता चौदाव्या दिवशी 25 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे आता या चित्रपटाने 400 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. चौदाव्या दिवसाचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या मते, चित्रपटानं आतापर्यंत 12 कोटी रुपये कमावले आहेत. यासह, 'छावा' चित्रपटाचं एकूण कलेक्शन आता 409.86 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या चित्रपटाने राजमौली यांचा चित्रपट 'बाहुबली 2', तसेच अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'लादेखील मागे टाकले आहे.
'छावा' चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225.28 कोटी रुपयांची कमाई केली. तसेच आठव्या दिवशी 24.03 कोटी रुपये, नवव्या आणि दहाव्या दिवशी 44.1 कोटी रुपयांची कमाई केली. अकराव्या दिवशी 19.10 कोटी रुपये आणि बाराव्या दिवशी 19.23 कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे हा चित्रपट पुढेदेखील अजून काही रेकॉर्ड्स मोडेल असे म्हंटले जात आहे.