बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट आता लवकरच ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आता घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'छावा' चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यानंतर ओटीटीवर पहाता येणार आहे. त्यानुसार हा चित्रपट आता 11 एप्रिल 2025 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. त्यामुळे आता चाहते मोठ्या आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत.
चित्रपट प्रदर्शित होऊन गेल्यानंतर अनेक दिवस उलटून गेले तरीही 'छावा'ची जादू अजूनही कायम आहे. अनेकांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहिला. चित्रपटाची भव्यता पाहून सर्वच जण चकित झाले होते. त्याचप्रमाणे विकी कौशलने साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. ही भूमिका विकीने अत्यंत लीलया पार पाडली आहे. त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अक्षय खन्नाच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची दाद मिळाली आहे. तसेच रश्मिका मंदनाने साकारलेल्या महाराणी येसूबाई देखील प्रेक्षकांना भावली.
छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा आता ओटीटीवर बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षक 'छावा' चित्रपट ओटीटीवर येण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.