पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दंड थोपटले. भव्य मोर्चाचंही आयोजन करण्यात आलं. या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार, म्हणून महाराष्ट्र 5 जुलैची वाट पाहू लागला. मात्र सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. त्यामुळे आता मोर्चाऐवजी विजय मेळावा होणारेय. तो दोन्ही ठाकरेंच्या एकीचाही असेल. पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीचा जागर मांडला. तोही पहिलीपासून हिंदीसक्तीविरोधात एल्गार पुकारत, दोघांनीही मोर्चांचं आयोजन केलं. पण त्याच्या तारखा मात्र वेगवेगळ्या होत्या. त्यानंतर चर्चा-सल्ला-मसलत होऊन एकत्र मोर्चा काढण्यावर एकमत झालं त्याची जोरदार तयारीही झाली. अनेक पक्षांनी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला अचानक सरकारने हिंदी सक्तीचा जीआरचं रद्द केला. ठाकरे बंधूंच्या नियोजित मोर्चाची हवा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही आता विजय मेळावा घेण्याचं दोन्ही ठाकरेंनी ठरवलंय. मात्र त्याचं ठिकाण अजून ठरलेलं नाही, वरळी डोम, शिवाजी पार्कची चाचपणी सुरू झालीय. ठिकाण कोणतंही असो पण हा विजयी मेळावा एकत्र काढण्याचा निर्धार मात्र करण्यात आलाय.
एकंदरीतच, मोर्चाच्या निमित्ताने एकत्र दिसणार असणारे उद्धव आणि राज ठाकरे आता विजयी मेळाव्यात एकत्र दिसणार आहेत. आणि अनेक वर्षांनतर या ठाकरे बंधूंचा झंझावात दिसणारेय. तरीही या विजयी मेळाव्यात दोन्ही ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता मात्र प्रचंड वाढलीय.