माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. विजय कुंभार म्हणाले की, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचे भासवून शासकीय अनुदान लाटले आहे.
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेंतर्गत, २०१५ पासून २ लाख रुपये वार्षिक अनुदान दिले जात होते. तथापि, ४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता, तरीही तो प्रस्ताव मंजूर झाल्याचे भासवून ७ ऑक्टोबर रोजी अनुदान १० लाख रुपयांपर्यंत वाढवले गेले आणि १६ शाळांना मंजूरही झाले.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, या शाळांचा संबंध अब्दुल सत्तार यांच्याशी असल्याचा संशय असून, संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ६ दिवसांत पूर्ण करण्यात आली. हे प्रकरण बेकायदेशीर असल्याने संपूर्ण चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मी केली आहे. असे विजय कुंभार म्हणाले.