(Vijay Namdevrao Wadettiwar) काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेतील तर उद्धव सेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी सहकार्याची ऑफर भाजपकडून दिल्याची विश्वसनीय माहिती समोर आली असून, या पावलामागे महाविकास आघाडीमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. महाविकास आघाडीची अधिकृत मागणी अशी की, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव सेनेचे भास्कर जाधव आणि विधान परिषदेसाठी काँग्रेसचे सतेज पाटील यांची नियुक्ती करावी. जाधव व पाटील यांची नावे सुचवत संबधितपणे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्याकडे पक्षांनी पत्रेही दिली आहेत.
परंतु शिंदे गटाला भास्कर जाधव यांची नियुक्ती मान्य नसल्याचे सूत्रांकडून समजते. जाधव विरोधी पक्षनेते झाले तर त्यांची टीका थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांवर राहील. उलट, वडेट्टीवार पुढे आले तर त्यांचा आक्रमकपणा महायुतीतील सर्व तीन पक्षांकडे समानपणे वळेल. त्यामुळे वडेट्टीवार हे जाधव यांच्यापेक्षा ‘सुवर्णमध्य’ वाटत असल्याने शिंदेसेना जाधव यांच्या उमेदवारीच्या विरोधात आहे, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच भाजपने काही मविआ नेत्यांना संपर्क करून वडेट्टीवार आणि अनिल परब या नावांना सहमती दर्शविण्याचा संदेश पोहोचवल्याची माहिती मिळते. जरी विरोधी पक्षनेते निवडण्याचा अंतिम अधिकार अध्यक्ष व सभापतींकडे असला, तरी सत्ताधारी पक्षाचा प्रभाव या प्रक्रियेत राहतो, हे पूर्वीच्या अनुभवानुसार दिसून आलं आहे.
मात्र, महाविकास आघाडीने स्पष्ट भूमिका घेतली आहे. भाजपच्या दबावाला बळी न पडता विधान परिषदेसाठी सतेज पाटील आणि विधानसभेसाठी भास्कर जाधव यांच्यावरच ठाम राहण्याची. “भाजपची ही चाल म्हणजे आमच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे; पण आम्ही तुटणार नाही,” असं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ आमदाराने नमूद केलं. सतेज पाटील आणि भास्कर जाधव यांच्याशिवाय अन्य कोणतेही नाव विचारात न घेण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी घेतला आहे. सतेज पाटील यांची मागणी अधोरेखित करण्यासाठी काँग्रेसचे आमदार सोमवारी सभापती प्रा. राम शिंदे यांना भेटले असून, मंगळवारी पुन्हा भेटण्याचे निश्चित करण्यात आलं आहे.