विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तसेच ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार कशापद्धतीने बघतंय तो सरकारचा विषय आहे. अलिकडे जे आम्ही महाराष्ट्रातील चित्र बघतो आहे आता पूर्वीसारखी काही आंदोलनाला धार दिसत नाही.
वारंवार आंदोलन करुन अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचे नुकसान आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला सरकारने कशापद्धतीने घ्यायचे ते सरकार ठरवेल. पण आमची सरकारला मागणी आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, 28 तारखेला ओबीसीच्या आरक्षणाच्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात केस आहे. पूर्वीप्रमाणे ओबीसीचे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय किंवा तो दिल्या शिवाय कुठल्याही निवडणुका राज्यात होऊ देणार नाही. ओबीसीचे आरक्षण डावलून जर सरकार निवडणुका घेत असेल तर महाराष्ट्रातील ओबीसी समाज हे सहन करणार नाही.
साधारणता 50 हजार जागा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसीच्या हक्काच्या आहेत. तो हक्क मारण्याचे काम जर सरकार करेल तर आम्ही सरकारला सोडणार नाही. हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.