दहावीच्या परीक्षेला काल सुरुवात झाली. मराठीचा पहिला पेपर झाला आणि जालन्यात दहावीचा पहिलाच पेपर फुटला आहे. जालन्यातील बदनापुर आणि मंठा तालुक्यात हा पेपर फुटला असून बदनापुरमध्ये चक्क 20 ते 30 रुपयांत पेपरच्या झेरॉक्स काढून त्या वाटण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे.
यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनायक राऊत म्हणाले की, दर्जेदार शिक्षण मिळणारे हे महाराष्ट्र आता भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलं आहे. यापूर्वीसुद्धा एक शाळा एक गणवेश ही घोषणा केली. त्या घोषणेचा फज्जा उडाला.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात कॉपीमुक्त परीक्षा आम्ही करु असे हे सरकार सांगत होते. त्या सरकारचा घोटारडेपणा आणि त्यांचा फज्जा आजच्या दहावीच्या पहिल्या दिवसाच्या पेपरफुटीमुळे दिसून आलेला आहे. शिक्षणमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, शिक्षण मंत्री यांनी याची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा. असे विनायक राऊत म्हणाले.