थोडक्यात
1 जुलै 2025 ही मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य
अंतिम मतदार यादी
राज्य निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी (Election Voter List) तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केला आहे. 1 जुलै 2025 ही मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना दिलेल्या यूजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने संबंधित प्राधिकरणांना 14 ऑक्टोबर पासून आयोगाच्या वेबसाईटवरून विधानसभेच्या मतदार याद्या डाऊनलोड करता येणार आहेत. विधानसभेच्या मतदार याद्यांच्या आधारे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारुप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 6 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर हा कालावधी ठेवण्यात आला आहे.
अंतिम मतदार यादी
प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय घेऊन 28 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 4 डिसेंबर रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी जाहीर केली जाईल. तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 10 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण
राज्य निवडणूक आयोगाने सांगितले की, सर्व महानगरपालिकांनी निश्चित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करावे आणि मतदार यादीतील नोंदींची शुद्धता सुनिश्चित करावी. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा या प्रक्रियेनंतर मार्ग मोकळा होणार आहे.