राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा थरार शिगेला पोहोचला आहे. १६ जिल्ह्यांमधील २४ नगरपरिषदांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, त्यामुळे प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या निवडणुका राज्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
नगरपरिषद निवडणुकांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची लढाई रंगली असून, प्रत्येक पक्षाने प्रचारात शेवटच्या टप्प्यात पूर्ण ताकद पणाला लावली होती. आता उद्याच्या मतदानानंतर २१ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालांकडे सर्व राजकीय पक्षांसह सामान्य जनतेच्या नजरा लागल्या आहेत.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
या २४ नगरपरिषदांच्या निकालातून राज्यातील राजकीय पक्षांची ताकद स्पष्ट होणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल सेमीफायनल मानले जात आहेत.
उद्या मतदान शांततेत पार पडते का, मतदानाचा टक्का किती राहतो, याकडेही सर्वांचं लक्ष असेल. तर २१ डिसेंबर रोजी येणाऱ्या निकालांमुळे राज्याच्या राजकारणात नवी दिशा मिळणार का, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.