राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज (दि. 15) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7 : 30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून असून संध्याकाळी 5:50 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. राज्यातील प्रमुख शहरे, औद्योगिक केंद्रे आणि महानगरांमध्ये ही निवडणूक होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूरसह 29 महानगरपालिकांमध्ये मतदान होत आहे. या निवडणुकीत हजारो उमेदवार रिंगणात असून कोट्यवधी मतदार आपला कौल देणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे.'
सत्ताधारी महायुती, महाविकास आघाडी तसेच इतर प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रॅली, जाहीर सभा, रोड शो यामुळे राजकीय वातावरण तापले होते. आज प्रत्यक्ष मतपेटीत उमेदवारांचे भवितव्य बंद होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस फौजफाटा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि फ्लाइंग स्क्वॉडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकांच्या निवडणुका या केवळ स्थानिक राजकारणापुरत्या मर्यादित नसून, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची दिशा ठरवणाऱ्या मानल्या जातात. त्यामुळे या निवडणुकीतील निकालांकडे सर्वच प्रमुख पक्षांचे नेते आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. मतदानानंतर उद्या (दि. 16) मतमोजणी होणार असून, कोणत्या शहरात कोण बाजी मारतो याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक मानला जात आहे.