राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यासंदर्भातील अधिसूचना 20 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार त्यांनी आज राज्याचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
श्री. यू. पी. एस. मदान यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबर 2024 रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होते. दिनेश वाघमारे हे विविध शासकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सदस्य सचिव; तसेच नवी मुंबई व पिंपरी- चिंचवड महानरपालिकेचे आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली होती.
वाशीम आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर त्यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारीपद मिळवले होते. तसेच ते नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष देखील होते. अमरावतीचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. वैद्यकीय शिक्षण विभागासह सामाजिक न्याय, ऊर्जा, गृह इत्यादी विभागांतही त्यांनी विविध पदे मिळवली आहेत.