महायुतीनं मोठ्या मताधिक्क्यानं विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. महायुतीतील भाजपा या निवडणुकीत मोठा भाऊ ठरला. त्यापाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळालं. महाविकास आघाडीचा तर या निवडणुकीत सुपडा साफ झाला. मोठं मताधिक्य मिळूनही महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी तब्बल 11 दिवस गेले आणि 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर महायुतीचा मंत्रीमंडळ विस्तार होण्यासाठी 15 डिसेंबरची सायंकाळ उगवली. यानंतर प्रश्न होता तो खातेवाटपाचा. सहा दिवसांचं नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपता संपता 21 डिसेंबरला रात्री खातेवाटपही जाहीर करण्यात आलं.
थोडक्यात
एकनाथ शिंदेंचं दबावतंत्र यशस्वी
शिवसेनेला 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद
शिवसेनेकडे नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकामसह महत्त्वाची खाती
खातेवाटपासंदर्भात गोपनियता बाळगण्यात आली. अधिवेशनाच्या समारोपाच्या पत्रकारपरिषदेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज रात्री किंवा लवकरच खातेवाटप जाहीर करण्यात येईल असं सांगितलं. मात्र, अगदी तासाभरानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आलं.
खातेवाटप होण्यापूर्वी मात्र 21 तारखेला म्हणजेच शनिवारी सकाळी मोठ्या घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चाय पे चर्चा केली. यावेळी अजित पवार काही वेळातच निघून गेले, मात्र फडणवीस आणि शिंदेंमध्ये जवळपास अर्धातासापेक्षा जास्तकाळ चर्चा झाली. खातेवाटपासंदर्भातच ही चर्चा होती.
राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप 21 डिसेंबरला जाहीर करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह आणि सामान्य प्रशासन, ऊर्जा, विधी व न्याय आणि महिती-जनसंपर्क ही खाती असतील. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकाससह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं असेल तर अजित पवारांकडे वित्त व उत्पादन शुल्क खातं ठेवण्यात आलं असून, चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खातं असणार आहे.
एकनाथ शिंदेंचं दबावतंत्र यशस्वी ठरलं
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदे दुस-या स्थानावर
भाजपनंतर शिंदेंच्या शिवसेनेकडे महत्त्वाची खाती
नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, सिडको, एमएमआरडीए शिंदेंकडे
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधीही शिंदेंच्या हातात
अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या मात्र, खर्चाचे अधिकार शिंदेंकडे
एकनाथ शिंदेंचा गृहखात्याचा आग्रह होता, मात्र गृहनिर्माण खातं मिळालं.
शिवसेनेकडे 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं
एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, सिडको, एमएमआरडीए
उदय सामंतांकडे उद्योग आणि मराठी भाषा
प्रकाश आबिटकरांकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
दादा भुसेंकडे शालेय शिक्षण
भरत गोगावलेंकडे रोजगार हमी, फलोत्पादन आणि मिठागर जमीन मिसाळ
गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता
संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण
शंभूराज देसाईंकडे पर्यटन आणि खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण
संजय शिरसाटांकडे सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे
कॅबिनेट मंत्रिपदांव्यतिरिक्त, शिवसेनेला राज्यमंत्रीपदेही मिळाली आहेत.
आशिष जैस्वाल यांच्याकडे वित्त आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, कायदा आणि न्यायव्यवस्था, कामगार
योगेश कदम यांना गृह (शहरी), महसूल, ग्राम विकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन.
शिवसेनेने पाच जणांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. तर तीन जणांना मंत्रिमंडळातून वगळलं आहे. एकंदर अनेक महत्त्वाची खाती खेचण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाल्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. आता राज्याचा कारभार कशाप्रकारे होणार याकडेच राजकारण्यांसह सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-