वाशिम जिल्ह्याला नवीन पालकमंत्री पदाची घोषणा झाली आहे. वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वात आधी वाशीमच्या पालकमंत्रीपदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव सुचवण्यात आलं होत.
मात्र, हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे, हसन मुश्रीफांनी जबाबदारी सोडली. त्यानंतर आता ही जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात वाशीम जिल्ह्याला लोकप्रतिनिधी नसल्याने अनेकदा वाशीमला बाहेर जिल्ह्यातीलच पालकमंत्री भेटले आहेत. मविआ सरकार असताना राज्यमंत्री असलेल्या भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले होते. नव्या जबाबदारीमुळे दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.