मराठवाड्यात उन्हाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून, याचा फटका जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यावर बसत आहे. तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला असताना, धरणातील दररोजच्या पाणी उपशाच्या तुलनेत तब्बल सहा पट अधिक बाष्पीभवन होत आहे. परिणामी, धरणाची पाणीपातळी वेगाने खाली येत आहे.
उष्णतेचा थेट फटका जायकवाडीला
पैठण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा जाणवत आहे. मार्चमध्येच बाष्पीभवनाचा वेग 55.285 दलघमी इतका नोंदवण्यात आला होता. मंगळवारी हा वेग 1.988 दलघमी पर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे, पिण्यासाठी दररोज 0.29 दलघमी पाणी उपसले जात असताना, बाष्पीभवनाचे प्रमाण त्याच्या सहापटीने होत आहे.
साठा भरपूर, पण चिंता कायम
यंदा जायकवाडी धरण 100% भरल्याने सध्या 47.39% इतका पाणीसाठा शिल्लक आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास तीनपट आहे. 15 एप्रिल 2024 रोजी फक्त 15.20% साठा असताना, यावर्षी तो 47.39% आहे. सध्या धरणात एकूण 1767.01 दलघमी पाणीसाठा असून, त्यातील 1028.90 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.
बाष्पीभवनाचा आकडा
1 जुलै 2024पासून आतापर्यंत एकूण 243.73 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांतच 130 दलघमीहून अधिक पाणी आकाशात विरळं झालं. पुढील काही दिवस 42 ते 43 अंश तापमानाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग अधिकच वाढण्याची चिन्हं आहेत.
पाणीपुरवठ्यावर परिणाम नको, पण दक्षता आवश्यक
जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर, वाळूज, शेंद्रा, जालना आदी शहरांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या साठा मुबलक असल्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्यात कपात होणार नसल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे. मात्र, जर बाष्पीभवनाचा वेग असाच कायम राहिला, तर येणाऱ्या काळात मराठवाड्याला पुन्हा एकदा पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.
उपायांची गरज
जायकवाडीतील वाढत्या बाष्पीभवनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना गरजेच्या आहेत. सौर उर्जेवर चालणाऱ्या फ्लोटिंग कव्हर्स, जलसंधारण प्रकल्प, आणि शेतकऱ्यांसाठी मायक्रो इरिगेशनसारख्या पर्यायांचा विचार करणे आवश्यक ठरत आहे.
धरणात पाणी असले तरी उष्णतेच्या झळा त्यावर ओरखडा उठवत आहेत. जर ही परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर भविष्यात मराठवाड्याच्या दुष्काळी चित्रात आणखी एक काळी रेषा उमटू शकते.