जलसंपदा विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेस पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात मोठी वाढ केली असून, यामुळे महापालिकेवर सुमारे १०० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. सध्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेने आधीच आंद्रा, भामा-आसखेड व पवना या तीन जलस्रोतांमधून पाणी उचलण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, यासाठी मोठा आर्थिक खर्च उचलावा लागणार आहे.
पूर्वी महापालिकेला जलसंपदा विभागाकडून दर 1000 लिटर पाण्यासाठी 55 पैसे दराने पाणी मिळत होते. नवीन दरानुसार, हा दर 1 रुपया 10 पैसे करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहराला दररोज सुमारे 510 एमएलडी पाणी लागते. यानुसार, आधी महापालिकेचे जलविषयक वार्षिक बिल सुमारे 26 कोटी रुपये होते, जे आता वाढून 52 कोटी रुपये होईल.
याशिवाय, मंजूर कोट्यापेक्षा अतिरिक्त म्हणजे 100 एमएलडी पाणी उचलल्यास, दर 1000 लिटर मागे 2 रुपये 20 पैसे आकारले जातील. त्यामुळे अतिरिक्त पाण्यासाठीच महापालिकेला सुमारे 74 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. हा खर्च नियमित शुल्काशिवाय आहे. या वाढीव शुल्कामुळे पाणीपुरवठा विभागाच्या एकूण खर्चात मोठी भर पडणार आहे.
महापालिकेने आंद्रा धरणातून 100 एमएलडी, भामा-आसखेड धरणातून 267 एमएलडी आणि पवना धरणातून अतिरिक्त पाणी उचलण्याची योजना आखली आहे. या तीनही प्रकल्पांमध्ये पुनर्वसन आणि इतर संबंधित खर्चांसाठी महापालिकेला पुढील पाच वर्षांत जलसंपदा विभागाला एकूण 279 कोटी रुपये अदा करावे लागणार आहेत.
या दरवाढीचा थेट परिणाम शहरातील नागरिकांवर होण्याची शक्यता असून, येत्या काळात पाणीपट्टीत वाढ करावी लागण्याची शक्यता महापालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. सध्या शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे वाढीव मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनत आहे.