राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना पुण्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर व विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. पावसामुळे उद्भवलेल्या अडचणींच्या अनुषंगाने अजित पवार म्हणाले की, “पुण्याचे पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून, योग्य ती उपाययोजना केली जात आहे.”
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत ते म्हणाले की, “केरळमध्ये रुग्णसंख्या वाढलेली असली तरी महाराष्ट्रात विशेषत: पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. दर आठवड्याला मंत्रिमंडळात कोरोनावर चर्चा होते. नागरिकांनी देखील स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे.”
आषाढी वारीसंदर्भात, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “वारीच्या नियोजनासाठी विविध स्तरांवर बैठकांचा आढावा घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.” पुण्यातील वाहतूक आणि रस्त्यांच्या समस्यांवर उपाय म्हणून, एक विशेष ऑनलाईन मोबाइल ॲप विकसित करण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर, अजित पवार म्हणाले की, “पंतप्रधानांनी प्रत्यक्ष भेट दिली असून, संबंधित मंत्री आणि अधिकारी देखील तपास यंत्रणांना गती देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मृतांच्या नातेवाईकांना देखील मदत करण्यात आलेली आहे.”
वारकऱ्यांच्या दिंड्यांना मिळणाऱ्या निधीबाबत, अजित पवार यांनी स्पष्ट केले की, “आम्ही कुठल्याही खात्याचा निधी वळवलेला नाही. वारकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून लवकरच निधी त्यांच्या खात्यात जमा केला जाईल.”
वीज बिल माफीबाबत, त्यांनी स्पष्ट केले की, “साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतचे कृषीपंप व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्यात आले आहे. यापुढील क्षमतेच्या शेतपंपधारकांना नोटीस गेली असली तरी ती धोरणानुसार आहे.”