आज राज्यात अनेक पक्षांचे दसरा मेळावे पार पडले आहेत. नवरात्रौत्सवात 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. आज शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थ येथे पार पडत आहे.
शिवसेना उपनेते नितीन बालगुडे त्यांच्या भाषणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळाव्याला सुरुवात झाली असून, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाने दसरा मेळाव्याला सुरवात झाली आहे. यादरम्यान प्रथम भाषणासाठी ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वप्रथम मंचावर येऊन भाजपवर जोरदार टीका केली.
दरम्यान संजय राऊत म्हणाले की, "या भर पावसात या चिखलात सर्व निष्ठावंत शिवसैनिक जमलेत. आज बाळासाहेबांचे लक्ष आपल्याकडे आहे. बाळासाहेबांनी शिवसेना नावाची ठिणगी टाकली त्याचा वणवा पेटला आहे. शिवतीर्थ फक्त शिवसेनेचा आहे. आज अनेकांनी विचारले आज चिखल झाला आहे का? त्यामुळे तुम्ही आज चिखल फेकणार का? तर हो आज गद्दारांवर चिखल फेक करणार त्यांची तीच लायकी आहे".
"इथल्या मुंबईतील रावणाला आज बुढवायचे आहे आणि दिल्लीतल्या रावणाला जाळ्याचे आहे. आम्ही शस्त्रपूजा केली, हे अमित शहांच्या पादुकांचे पूजा करत आहेत. हे सरकार वोट चोरीतून आलेले आहे. सर्व पक्षाची चोरी यांनी केली आहे. मुंबईतल्या चोर बाजाराचं नाव मोदी बाजार करा. एवढ्या चोऱ्या यांनी केल्या आहेत, मिळेल ते चोरत आहेत. ही लढाई मोठी आहे ही लढाई मुंबईची आहे महाराष्ट्राची आहे दिल्लीची आहे".