राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतील महायुतीच्या जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर स्पष्ट उत्तर दिलं आहे. ठाण्यात भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती का केली आणि जागावाटपात नमतं का घेतलं, यामागची “इनसाईड स्टोरी” त्यांनी उघड केली आहे. ठाणे भाजपतर्फे बुधवारी (७ जानेवारी) गडकरी रंगायतन येथे आयोजित ‘आपलं ठाणे, आपला देवाभाऊ’ या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी त्यांची मुलाखत घेतली. या संवादात ठाण्यात भाजपने स्वबळावर न लढता शिवसेनेसोबत युती का केली, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ठाण्यातील आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते यांची इच्छा होती की भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी. हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो.” भाजपचे सध्या २४ नगरसेवक असून, स्वबळावर लढल्यास ही संख्या वाढवण्याची संधी होती, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक जवळपास दहा वर्षांनंतर होत आहे. प्रत्येक महापालिका निवडणुकीनंतर एक नवी पिढी राजकारणात तयार होते. २०१७ नंतर एक पिढी तयार झाली, २०२२ साठी दुसरी पिढी पुढे आली आणि आता २०२२ नंतर आणखी एक पिढी तयार झाली आहे. आज दोन पिढ्या एकत्रितपणे निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. अशा परिस्थितीत युती केल्यास सर्व कार्यकर्त्यांना संधी देता येणार नाही, ही वस्तुस्थिती असल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र तरीही, ठाण्यासारख्या शहरात केवळ जागांच्या संख्येसाठी युती तोडणं योग्य ठरणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “ठाणे हे बाळासाहेब ठाकरे यांचं अत्यंत आवडतं शहर होतं. या शहरात शिवसेना आणि भाजपने वर्षानुवर्षे एकत्र काम केलं आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे. अशा वेळी छोट्या राजकीय फायद्यासाठी वेगवेगळं लढून वाद निर्माण करणं योग्य नाही.” युती तोडली असती तर सत्ता मिळाली असती, मात्र त्यामुळे मनं दुखावली गेली असती, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळेच “आवश्यकता पडली तर थोडी पडती बाजू घ्यायची, कमी जागा घ्यायच्या, पण युती टिकवायची,” असा निर्णय आपण घेतल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
या निर्णयानंतर पक्षातील सर्वांनी आपली भूमिका मान्य केली आणि आज भाजप-शिवसेना एकत्र लढत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “मला खात्री आहे की ठाण्यात घेतलेला हा निर्णय योग्य आहे. मुंबईतही आम्ही जो निर्णय घेतला आहे, तोही योग्यच आहे,” असं ठाम मत व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी युतीमागची भूमिका स्पष्ट केली. ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीने एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याने, या निवडणुकीत स्थैर्य, परंपरा आणि राजकीय समन्वयाला प्राधान्य देण्यात आल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.