महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्याचा 2025-26 वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवारांनी आज दुपारी २ वाजता विधानसभेत सादर केला आहेत. या अर्थसंकल्पात शेतकरी, लाडक्या बहिणी व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का, याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला लागलेली आहे.
लाडक्या बहिणींना किती दिला निधी
10 हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण देत आहोत
कौशल्य विकासासाठी 800 कोटी रुपयांची नियतव्यय प्रस्तावित
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येणार.त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे.
2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन.
मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची 100 टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे.
मान्यताप्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सुमारे 22 लाख महिलांना “लखपती दिदी” होण्याचा मान मिळाला असून सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट.
नवी मुंबईत उलवेमध्ये 194 कोटी 14 लाख रुपये किंमतीच्या “युनिटी मॉल”चे काम प्रगतीपथावर आहे.
वैद्यकीय आणि सर्वसामान्यांना काय ?
स्वच्छ भारत अभियान ग्रामीण, टप्पा-2 अंतर्गत घनकचरा, सांडपाणी व प्लास्टीक कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच घरगुती स्वच्छतागृहांची कामे हाती घेण्यात आली असून सन 2025-26 मध्ये त्यासाठी 1 हजार 484 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरापासून 5 किलोमीटरच्या परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. आयुष्मान भारत- प्रधान मंत्री जनआरोग्य योजनेची ओळखपत्रे कालबध्द पद्धतीने वितरित करण्यात येणार असून महात्मा फुले जनआरोग्य योजनेत अंगीकृत रुग्णालयांच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे
ठाणे येथे 200 खाटांचे, रत्नागिरी जिल्ह्यात १०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय आणि रायगड जिल्ह्यात २०० खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्यात येत आहे.
स्वर्गीय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने “आनंदवन”ला देण्यात येणाऱ्या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात भरीव वाढ करण्यात येणार आहे.
राज्यातील मागासवर्गीय व दुर्बल घटकांसाठी निवारा, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, पोषण तसेच रोजगारासाठी योजना राबविण्यात राज्य अग्रेसर असून महायुती सरकार या घटकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी कटीबध्द आहे.