मालेगाव तालुक्यातील डोंगराळे परिसरात तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यभर तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावात भीती आणि शोकाचे वातावरण असून आज मालेगाव शहरात कडकडीत बंद पाळला जात आहे. आरोपी खैरनारला न्यायालयाने 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असली तरी पीडित कुटुंबास ही कारवाई अपुरी वाटत असून “तात्काळ कठोर शिक्षा” हीच त्यांची मागणी आहे. कुटुंबाच्या वेदना आणि रोषामुळे संपूर्ण समाज हादरला आहे.
पीडित बालिकेचे काका राकेश दुसाने यांनी मुख्यमंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना धडक भेटी देत आपला आक्रोश व्यक्त केला. “माझ्या भाचीवर क्रूरपणे अत्याचार करून हत्या केली गेली आहे. आरोपीने स्वतः गुन्हा कबूल केला आहे, मग दीर्घ प्रक्रिया कशासाठी? त्याला थेट फाशी द्या किंवा गावासमोर एनकाउंटर करा,” असे ते म्हणाले. त्यांनी सरकारला ११ दिवसांची मुदत दिली असून या कालावधीत ठोस निर्णय न झाल्यास ते उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही दिला आहे. “गरज पडली तर मालेगावहून मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा काढेन,” असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
दरम्यान, राज्यातील विविध नेतेमंडळींनी कुटुंबाची भेट घेतली. रूपाली चाकणकर, ज्योती वाघमारे, तसेच गिरीश महाजन यांनी कठोर शिक्षेची भूमिका मांडत न्याय मिळेल असे आश्वासन दिले. मात्र कुटुंबाची एकच ठाम मागणी“फास्ट ट्रॅक कोर्ट नको, थेट शिक्षा हवी.” त्यांना भीती आहे की विलंब झाला तर न्यायाची प्रक्रिया लांबत जाईल आणि गुन्हेगारावर योग्य वेळी कारवाई होणार नाही. गावातील नागरिकांकडूनही आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपीने बालिकेला घराबाहेर नेले आणि तिच्यावर निर्घृण कृत्य केल्याचेही कुटुंबाने सांगितले.
या घटनेने परिवारावर मानसिक आघात झाला असून पीडितेची आई, आजी आणि आजोबा परिस्थिती पाहून कोसळले. तिघांचीही रुग्णालयात उपचार सुरू असून ते सध्या बोलण्याच्या स्थितीत नाहीत. बालिकेच्या पित्याचा संतापही ओसंडून वाहताना दिसत आहे. त्याने मागणी केली की आरोपीला स्वतःच्या हवाली करावे, तो गावासमोर शिक्षा करून दाखवेल, जेणेकरून अशा विकृतांना वचक बसेल.
याचबरोबर राकेश दुसाने यांनी अत्यंत महत्त्वाची मागणी केली आहे. “दहा ते बारा वर्षाखालील मुलींवर अत्याचार करणारा आरोपी गुन्हा कबूल करत असेल तर लांबलचक न्यायप्रक्रियेला अर्थ नाही. पोलीस स्टेशनवरच तातडीची शिक्षा देण्याचा कायदा सरकारने तयार करावा,” असे त्यांनी म्हटले आहे. या विधानांमुळे राज्यात चर्चा रंगल्या आहेत. सध्या मालेगावमध्ये बंद, मोर्चे आणि निदर्शने सुरू असून येणारे ११ दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. सरकार ठोस कारवाई करते की कुटुंब व नागरिकांचा आक्रोश अधिक तीव्र होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाकडे टक लावून बघत असून या निर्घृण कृत्यासाठी कठोर शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.